लोकमान्य टिळकांचे ‘गीतातहस्य अथवा कर्मयोगहे  पुस्तक वाचून पाहण्याची जिज्ञासा एकाएकी माझ्या मनात उत्पन्न झाली. ती अचानकरीत्या पुरीही झाली. दादरच्या टिळक पुलावरून जात असताना आयडियल बुक डेपोत डोकावून पाहण्याचा विचार माझ्या मला आला. अगदी अकल्पितरीत्या गीतारहस्याची एक जुनी प्रत त्या दुकानात मला लोकमान्य टिळक मिळाली. ती प्रत जुनी असूनही छापील किमतीपेक्षा

कमी करायला सेल्समन तयार नव्हता. ते पुस्तक दुर्मिळ असल्याने मी ते घेतले. गीतेवर ज्ञानेश्वर, टिळक आणि विनोबा ह्यांचे भाष्य वाचून पाहण्याखेरीज पर्याय नाही असे खूप पूर्वीच माझ्या लक्षात आले होते.

‘बायबल’ हा ख्रिश्चन धर्मियांचा तर ‘कुराण ए शरीफ’ हा मुस्लिमांचा धर्मग्रंथ मानला जातो. भारतात  अल्पसंख्य असलेल्या पारशांच्या ‘अवेस्ता’ हा धर्मग्रंथ आहे. हे धार्मिक ग्रंथ त्या त्या धर्माच्या अनुयायांकडून  फारसे वाचले जात नाही हे मला प्रत्यक्षात अनेकदा पाहायला मिळाले. मी स्मॉल कॉजेस कोर्टात ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर पदावर होतो. साक्ष देण्यापूर्वी साक्षीदाराला त्याच्या धर्म ग्रंथावर हात ठेवून शपथ घ्यावी लागते. भारतात ओथ ॲक्ट नावाचा कायदा असून ह्या कायद्यानुसार साक्षीदारावर शपथ घेण्याचे बंधन आहे. साक्षीदाराला शपथ देण्याचे काम इंटरप्रिटर ह्या नात्याने माझ्याकडे होते. साक्ष संपली की इंटरप्रिटरला फारसे काम नसते. दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद सुरू झाल्यानंतर युक्तीवाद करणा-या वकिलास एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात कागदपत्र हवे असले तर ते त्याला अचूक काढून देण्याचे काम इंटरप्रिटरकडे असते.  हे काम करता  युक्तिवाद ऐकण्याची मला सवय लागली. युक्तिवाद ऐकायचा कंटाळा आला की मी गीता किंवा बायबल चाळत असे. त्या काळात त्या ग्रंथातले एखादे वाक्य समजले तरी खूप झाले अशी माझी अवस्था होती.

माझे वडिल रोजची पूजा संपल्यावर विनोबांची

गीताई वाचत असत. मला त्यांच्या पूजेत रस नव्हता. एकदा बोरीबंदरच्या स्टॉलवर दुसरे कुठले तरी पुस्तक शोधत असताना सर्वोदयच्या स्टॉलवर विनोबांच्या गीताईकडे माझे लक्ष गेले. मी ती लगेच ती घेतली. त्यानंतर काळबादेवीच्या एका दुकानात गीताप्रेस गोरखपूरची पुस्तके मिळत असत. तिथेही मला फक्त विनोबा

टेक्स्ट असलेली गीतेची प्रत मिळाली. फक्त श्लोक असलेल्या दोन प्रति विकत लगेच घेतल्या.

ज्ञानेश्वरीदेखील भल्याभल्यांना समजत नाही. प्री डिग्रीला असताना ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय आम्हाला अभ्यासाला होता.  तो अध्याय प्रा. सुधाकर जोशी अत्यंत मेहनतपूर्वक शिकवला. तो मला परीक्षेपुरता समजला. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या मी वाटेला गलो नाही. एकदा चर्नी रोड स्टेशनला उतरून महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेली ज्ञानेश्वरीची प्रत मी विकत घेतली. घरी आल्यावर चाळून पाहिली. ज्ञानेश्वरी मेरे बस की बात नही हे लक्षात आले. त्यानंतर ते पुस्तक शेल्फवर गेले.

ज्ञानेश्वरीचा अर्थ समजण्याची माझी इच्छा पुरी होण्याचा योग एक दिवशी अचानक आला. कर्जत येथे राहणारे गजाननमहाराज अटक ह्यांच्याकडून ज्ञानेश्वरी आणि तुकारामगाथा समजून घेण्याची माझी इच्छा अनपेक्षितरीत्या पूर्ण झाली. गजाननमहाराज अटक ह्यांचे शिक्षण आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत झाले होते. ते मामासाहेब दांडेकरांचे शिष्य होते. त्यांची माझी ओळख आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी हेमंत कारंडे ह्यांनी करून दिली. कर्जतजवळील शिरसे ह्या खेड्यात अटकमहाराजांनी वैष्णव पंथीय संस्कार केंद्र सुरू केले होते. ते सुरू करण्याची प्रेरणा मामांनीच त्यांना दिली होती. कारंडेंबरोबर वैष्णव संस्कार केद्राच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मी कर्जतला गेलो. अटकमहाराजांना मी स्पष्टपणे सांगितले, मला ज्ञानेश्वरी समजत नाही. ती कशी वाचणार? पारायण केले तर ज्ञानेश्वरी समजेल का ?

ते म्हणाले, मुळात वाचूच नका. पहिल्या अध्यायापासून अठवा अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरीतील प्रत्येक  ओवीवरून तुम्ही नुसते बोट फिरवायचे. बोट फिरवता फिरवता नजरही फिरवायची. अठरावा अध्याय मोठा आहे. अठराव्या दिवशी तो सुरू करून एकविसाव्या दिवशी तो संपवायचा. ह्याप्रमाणे २१ दिवसांचे पारायण तुम्ही केले की तुम्हाला ज्ञानेश्वरी हळुहळू नक्कीच समजेल. पाहिजे तर तुम्हाला मी हे स्टँपपेपरवर लिहून द्यायला तयार आहे !

‘किती पारायणे केली पाहिजे?’

‘संख्येत अडकू नका.’

त्यांच्या म्हणण्यानुसार मी ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू केले. पारायण करताना अडथळ्यांच्या शर्यतींशी मला सामना करावा लागला. तरीही मी जिद्दीने ते पुरे केले. अध्याय संपला की शेवटी दिलेल्या शब्दकोशावरूनही नजर टाकण्याची मला सवय लागली. तीनचार शब्दांचे अर्थ कळले तरी बस्स झाले असा माझा दृष्टीकोन होता. मात्र, पारायणाचा विषय चुकूनही मी कुणाकडे काढला नाही. एकदोन पारायणानंतर मामासाहेबकृत सार्थ ज्ञानेश्वरीची एक प्रत अटकमहाराजांनी मला भेट दिली. प्रत सार्थ असल्याने मला ओवी न् ओवीचा भावार्थ थोडाफार उलगडत गेला.

गीतारहस्याच्या बाबतीतही शेवटी मी हेच तंत्र अवलंबले. ह्या सगळ्या खटाटोपातून एक गोष्ट मला शिकायला मिळाली. कोणतेही पुस्तक वाचताना ते किती समजते ह्याची फिकीर करत बसण्याची गरज नाही. जितके समजेल तितके समजेल हे नवे धोरण मला उपयोगी पडले.गीतारहस्याच्या  बाबातीतही असाच अनुभव आला.  विस्मृतीत जमा झालेली गीतारहस्याची प्रत मी काढली. थोडीफार चाळली. परंतु अटकमहाराजांनी सांगितलेल्या तंत्रानुसार मी ती चाळून पाहिली. प्रस्तावना वाचता वाचता मला त्यात रस निर्माण झाला. आश्चर्य म्हणजे अनेक पाश्चात्य विद्वानांनी गीतेची भाषान्तरे केल्याची माहिती मला कळली. युरोपमध्ये गीतेचा सखोल अभ्यास सुरू झाल्याचेही टिळकांनी म्हटले होते.  गीतेतच्या तत्त्वज्ञानात्मक बाजूवरही युरोपातील विद्वानांच्या तत्त्वज्ञानाबरोबर तुलना केली. हा ग्रंथ त्यांनी इंग्रजीत लिहला असता तर लोकमान्यांच्या प्रतिमेस आतंरराष्ट्रीय परिमाण लाभले असते. गीतारहस्यचे वाचन सुरू केल्यावर पहिल्या पुस्तकाचा दोनतीन पानातच माझी विकेट गेली.

गीतारहस्याची मुद्रणप्रत तयार करताना करण्यासाठी मंडालेच्या तुरूंगात पेन्सिलीने लिहलेल्या ह्या पुस्तकाचे हस्तलिखित मिळवण्याचे काम होते. सुदैवाने ब्रिटिश सरकारने ते हस्तलिखित परत दिले.  टिळकांच्या हयातीतच गीतारहस्यच्या तीन आवृत्त्या प्रसिध्द झाल्या. तिन्ही आवृत्त्या मिळून एकूण २० हजार प्रती संपल्या. विक्रीचा हा प्रचंड आकडा पाहिल्यावर गीतारहस्य पुस्तकाचे तत्कालीन महाराष्ट्रात किती जोरदार स्वागत झाले ह्याची कल्पना आली. ९०० पानांच्या ह्या पुस्तकाची छपाई चित्रशाळा प्रेसमध्ये झाली. प्रुफे तपासण्याचे काम रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर, रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर, हरी रघुनाथ भागवत ह्यांनी आपणहून पत्करले होते. पुस्तकाच्या कामात मदत करण्यासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर  मुंबईहून पुण्याला गेले होते.

एकदा बोरीबंदर सर्वोदय स्टॉलवर विनोबांची गीताई मला दिसली. मी ती ताबडतोब घेतली. वर्ध्याला गेलो तेव्हा पवनार आश्रमातही मी विनोबांची गीताई विकत घेतली. त्याखेरीज विनोबांच्या फुटकळ लेखांचा संग्रहही विकत घेतला. गीताईच्या लेखनाची पार्श्वभूमीदेखील अशीच मजेदार आहे. ते आईला गीता वाचवून दाखत असत. वाचता वाचता अर्थही समजावून सांगत. त्यामुळेच गीतेच्या अर्थाची फोड करण्यात ते यशस्वी झाले. टिळकांचाही अनुभव काहीसा असाच आहे.

गीतारहस्यमुळे गीतेची तत्त्वज्ञानात्मक बाजू माझ्या लक्षात आली तर विनोबांच्या गीताईमुळे प्रत्येक श्लोकांचे मागचे पुढचे संदर्भ हळुहळू उलगडू लागले. आज टिळक जयंती. गीतेची गोडी मला कशी लागली ह्याचे रहस्य उलगडण्याचा टिळकपुण्यातिथीसारखा महत्त्वाचा दिवस दुसरा नाही. गीतावाचनाचे वैयक्तिक रहस्य ह्या लेखात मी प्रथमच उलगडत आहे.

लोकमान्य टिळकांना माझी विनम्र आदरांजली!

रमेश झवर

Published by रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार, भूतपूर्व ज्येष्ठ सहसंपादक, लोकसत्ता, एक्सप्रेस समूह

Join the Conversation

1 Comments

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.