महाभारत काळात राजे लोकांत परस्परांबरोबर द्यूत खेळणे हे शिष्टसंमत होते. त्या द्युतातून पुन्हा द्यूत किंवा युध्द अपरिहार्य होते. पांडवाबरोबर द्यूत खेळून त्याचे राज्य जिंकून घ्यावे ही दुर्योधनाच्या मनातली इच्छा धृतराष्ट्राला कळली नाही असे मुळीच नाही. पुत्रमोहाला तो बळी पडला होता. नेत्रहीन व्यक्तीला राज्याचा राजा होण्याचा अधिकार नाही हेही त्याला पुरेपूर माहित होते. म्हणूनच हस्तिनापूरचे राज्य दुर्योधनाकडे सुपूर्द करण्यासाठी आणि इंद्रप्रस्थाचे राज्य परत मिळवण्यासाठी खेळल्या गेलेल्या कपट द्युतास धृतराष्ट्राचा छुपा पाठिंबा होता. हा पाठिंबा गुप्त ठेलण्याची खबरदारी त्याने घेतली.

राजदरबाराला आप्तस्वकियांच्या भेटीसाठी मुद्दाम हस्तिनापूरला येण्याचे अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यासाठी धृतराष्ट्राने विदुरला इंद्रप्रस्थाला पाठवले. दरबारात मनोरंजनासाठी द्यूतही होईल असे बोलण्याच्या ओघात सांगण्याची खबरदारी धृतराष्ट्राने घेतली. पांडवांचा हितचिंतक असूनही त्याचा मुद्दाम वापर करून घेण्यात आला. परंतु ह्या भेटीचा खरा उद्देश पांडवांना सरळ सरळ द्यूत खेळण्यास पाचारण करण्याचाच होता हे पुढे घडलेल्या घटनांवरून दिसून आले.

विशेष म्हणजे द्यूत खेळण्यास प्रारंभ झाला त्यावेळी धृतराष्ट्र दरबारात मुद्दामच उशिरा आला. त्यानंतर द्युताचा पहिला नियम असा की ज्याला द्यूत खेळायचे आहे त्याने ज्याच्याशी द्यूत खेळायचे आहे त्याच्या दरबारात जाऊन खेळले पाहिजे. पांडवांना द्यूत खेळण्यास बोलावणे हा द्यूताचा नियमभंग होता. द्युताचा दुसरा नियम असा की द्यूत खेळण्यासाठी संपत्ती पणास लावणा-याने स्वत: द्यूत खेळले पाहिजे. संपत्ती दुर्योधनाची आणि द्यूत खेळणार शकुनीमामा हा दुसरा नियमभंग. द्युतात पहिले काही डाव युधिष्टराने जिंकला खरा, परंतु पुढे त्याची हार होत गेली. युध्दिष्ठराने शेवटी स्वत:ला पणास लावले. हा डाव तो हरला. वास्तविक हारल्यानंतर आपल्या बंधूंना पणास लावण्याचा अधिकार त्याने गमावला होता. जेव्हा युधिष्टराने द्रौपदीला पणास लावले तेव्हा तिने हा मुद्दा उपस्थित केला. भीमानेही त्याला दुजोरा दिला. वास्तविक त्या वेळी द्युताचे ४ जाणकार दरबारात होते. पण ते गप्प बसले. कृष्ण हाही द्युताचा जाणकार होता. परंतु द्यूत खेळले दात होते तेव्हा तो दरबारात उपस्थित नव्हता. द्युताची हकिगत समजली जेव्हा त्याला समजली तेव्हा त्याने असे उद्गार काढले की, मी तेथे हजर असतो तर हे द्यूत होऊच दिले नसते !

द्रोपदीचे वस्त्रहरण सुर झाल्यानंतर तिने कृष्णाचा धावा केला. कृष्णानेही तिची लाज राखली. जे झाले ते बरोबर झाले नाही हे धृतराष्ट्राच्याही लक्षात आले. पांडवांना त्याने मुक्त केले. ते जायला निघाले तेव्हा एक डाव खेळण्यासाठी शकुनीच्या सांगण्यावरून त्याला पुन्हा माघारी बोलावण्यात आले. पांडवही परत फिरले. शेवटचा डाव खेळण्यासाठी! हा डाव खेळताना त्यांना मनोमन खात्री होती की ह्यापुढे युध्द अटळ आहे.

घडलेही तसेच.

दु :सनाला शिक्षा झालीच पाहिजे असे द्रौपदीला वाटू लागले. कौरव दरबारात शिष्टाई करण्यासाठी कृष्ण निघाला तेव्हा तिने तिच्या मोकळ्या केसांची आठवण करून दिली. शिष्टाईचा काही उपयोग होणार नाही हे कृष्ण जाणून होता. उलट कृष्णालाच अटक करण्याचा घाट दुर्योधनांनी घातला तेव्हा कृष्ण संतापला. मला अटक करून तर पाहा, असे कृष्णाने आव्हान दिले. कृष्णाने दिलेल्या आव्हानामुळे कौरवसभेवर भयाचे सावट पसरले. महाभारत युध्दाची अपरिहार्यता कसकशी स्पष्ट झाली ह्याचा हा थोडक्यात इतिहास आहे.

अजितदादांचा केंद्रीय सत्ताधा-यांबरोबर सत्तेचा जुगार खेळायचे ठरवले असावे. ते यशस्वी होतील की अपेशी ठरतील हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसेल.

रमेश झवर