मणीपूरमध्ये दोन जमातीमधील कलहामुळे पेटलेला संघर्ष शमण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाही. दोन स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार वास्तविक गेल्या मे महिन्यात घडला होता. त्याचा व्हिडियो  प्रसिध्द झाल्यानंतर देशाचे तिकडे लक्ष वेधले गेले. विशेष म्हणजे ह्या राज्यात भाजपाची सत्ता असून मुख्यमंत्र्यांची नेमणूक केंद्रीय अर्थात केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्यात आल्यानंतरच झाली  असणार हे उघड आहे. म्हणूनच मणीपूरमधल्या घडामोडींकडे केंद्रीय नेते लक्ष द्यायला तयार नाहीत. मध्यंतरी गृहमंत्री अमित शहांनी मणीपूरमधील परिस्थितीत थोडे लक्ष घातले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले नाही. ह्याचा अर्थ असा की केंद्रीय सत्ताधारी पक्ष स्वार्थापलीकडे जाण्यास तयार नाहीत. भाजपाशासित अनेक राज्यात खिंडार पडल्याचे हे चित्र आहे. जे राजकीय निरीक्षकांना दिसते ते केंद्रीय नेत्यांना दिसत नाही हे दुर्दैव आहे.

एका बाजूला मणीपूरची सीमा असामला लागून तर दुसरी सीमा म्यानमारला लागून आहे. ही वस्तुस्थिती ध्यानात घेतल्यास मणीपूरमध्ये धोकादायक परिस्थिती अधिक काळापर्यंत चालू राहणे देशाच्या दृष्टीने योग्य  नाही. पण हे केंद्रीय नेत्यांना कोण समजावून सांगणार? कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी भाजपा नेते त्यांचे मुळीच ऐकणार नाहीत! उलट सांगणा-यावर प्रत्यारोप करून ते मोकळे होतील. सर्वोच्च   भाजपा नेत्याला असे वाटते की अशी प्रकरणे २०२४ लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच्या काळात ह्या काळात उपस्थित होणे भाजपाला निश्चित धोकादायक ठरू शकते. म्हणूनच दोन महिने तिकडे त्यांनी लक्ष दिले नाही.

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली. मध्यप्रदेश, राजस्थान. छत्तीसगड, तेलंगण ह्या राज्यातही चालू वर्षात निवडणुका होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ईशान्य भारतात त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोरम ह्या राज्यात निवडणुका जाहीर होणार आहेत. ह्या सा-या  राज्यात सत्ता मिळाली तरच भाजपाचा आगामी लोकसभा निवडणुकीत निभाव लागेल. ह्या पार्श्वभूमीवर मणीपूरमधली अस्वस्थता भाजपाला परवडणारी नाही. त्याच बरोबर हिंदुत्वाचा जाणूबुजून पसरवण्यात आलेला ज्वर ओसण्याची भीती भाजपा नेत्यांच्या मनात आहेच. सबका साथ सबका विकासह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केलेल्या घोषणेचा फोलपणा एव्हाना जनतेच्या लक्षात आला आहे. मोदी  आडनावाविषयी काँग्रेस नेते राहूल गांधी ह्यांनी कोलार येथे काढलेल्या गाफील उद्गाराचे निमित्त करून त्यांच्या लोकप्रतिनिधित्वचा अधिकार मोदी सरकारने संपुष्टात आणला. राहूल गांधींवर कोर्टकचे-या करण्याची पाळी आली. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेल्यास राहूल गांधींच्या राजकारणात आडकाठी उभी करण्यात भाजपाला यश मिळाल्यासारखे होईल हे खरे; परंतु नेहरू परिवारातल्या व्यक्तीविरूद्ध  सूड उगवण्याचाच हा प्रयत्न असल्याचीच भावना जनमानसात रुजली  त्याचे काय?

आंतरराष्ट्रीय राजकारणात बलाढ्य लोकशाही देशाचा नेता अशी आपली प्रतिमा असल्याचा समज पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी करून घेतला. हा त्यांचा समज निव्वळ भ्रम असल्याचे लौकरच स्पष्ट होईल अशी चिन्हे दिसू लागील आहे. समजा त्यांची प्रतिमा चांगली असली तरी त्याचा फायदा विदेश व्यापारातील्या वृध्दीखेरीज फारसा होणार नाही. आणि भारतातल्या जनसामान्यांना भारतीय लोकशाहीविषयक परदेशातल्या मतप्रवाहाशी काही देणेघेणे नाही. सामान्य शेतकरी, गरीब कष्टकरी नोकरदार आणि सुखवस्तु मध्यमवर्ग ह्यापैकी कोणालाही देणेघेणे नाही. मला पामोलीन तेल मिळते की नाही, अंगभर वस्त्र मिळते की नाही, शेती पिकली की नाही ह्या सा-याची चिंता दूर होणे महत्वाचे असते. जनतेच्या ह्या आघाडीवर फसवणूक चालत नाही. खपवून घेतली जात नाही. रोकडा व्यवहार पाहण्याचा हा नियम काँग्रेस काळात दिसून आला. म्हणूनच काँग्रेसला त्याचा फटका बसला होता. हा नियम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसणार हे स्पष्ट आहे.

धगधगत्या मणीपूरचा हा इशारा आहे! तो ओळखण्याची हीच वेळ आहे.

रमेश झवर

Published by रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार, भूतपूर्व ज्येष्ठ सहसंपादक, लोकसत्ता, एक्सप्रेस समूह

Join the Conversation

4 Comments

  1. भाजप नेत्यांचे मौन
    मणिपूर मधील अशांतता आणि उद्रेक हे भाजपचे मोठं राजकीय अपयश आहे. विशेष म्हणजे गेली ७५ दिवसांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. तेथे मोदी वा शहा गेलेले नाहीत. एरव्ही टाचणी जरी पडली तरी धाव घेणारे भाजप नेते शांत आहेत.
    मणिपूर मध्ये काही काळ राष्ट्रपती राजवट आणून परिस्थिती नियंत्रणात आणणे,हे केंद्राचे काम आहे. भाजपच्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यात नामुष्की राहणार आहे. परंतु ती पदरात बांधून पुढे जावे लागेल. आता मणिपूर लोण संपूर्ण ईशान्य भारतात पसरत आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक आहे.
    डाॅ. संजय रत्नपारखी
    . मंबई

    Like

  2. धगधगत्या मणीपूरचा इशारा : योग्य निरीक्षणे नोंदवून दिलेला तपशील अभ्यासपूर्ण आहे तसेच देशाची चिंता वाढवणाराही आहे. देशहित कमी, राजकारण अधिक ही व्यवस्था बदलेल तो सुदिन.

    Like

  3. संस्कृती धुळीस मिळत आहे!
    मणीपूरचे धगधगते वातावरण बायकाना नागड्या स्वरूपात फिरवणे व त्याना न्याय मिळवून न देणे हे देशाला हितकारक नाही. स्त्रियांची
    अब्रू वेशीवर आणणा-यांना शासन केले नाही तर देशाची संस्कृती धुळीला मिळवण्याचे पातक कोण करत आहे ते सामान्य जनतेला
    कळलेले आहे. ती मनातली गोष्ट निश्तितच आपोआप बाहेर येत आहे.
    रवींद्र बागडे, मुंबई

    Like

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.